७८८७८८२०२६

vanarti.info@gmail.com

1200px-Emblem_of_India.svg-603x1024

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था

(वनार्टी)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
CIN: U84120MH2026NPL466492

VANARTI

प्रस्तावना

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (VANARTI)
 
महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत ग्रामीण भाग, शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या दूरदर्शी नेतृत्वाचे नाव म्हणजे महानायक वसंतराव नाईक. शिक्षण, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेच्या बळावर समाजपरिवर्तन साध्य होऊ शकते, हा त्यांचा दृढ विश्वास होता. वंचित घटकांना समान संधी उपलब्ध झाल्यासच खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण होऊ शकते, ही त्यांची विचारधारा आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरते.
ज्ञानाचा प्रकाश हा सामाजिक समता, आर्थिक स्वावलंबन आणि बौद्धिक सबलीकरणाचा भक्कम पाया घडवतो. समाजातील वंचित, उपेक्षित आणि मागास घटकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे सामर्थ्य शिक्षणात दडलेले आहे. हाच परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा इतर मागास व बहुजन कल्याण विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या प्रेरणेतून स्थापन झालेली वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (VANARTI) ही संस्था प्रशिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व सक्षमीकरणाची नवी दिशा घडवत आहे. दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णयान्वये स्थापन झालेली ही संस्था कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नियम ८ अन्वये नोंदणीकृत स्वायत्त संस्था असून ही संस्था गोर बंजारा जमातीसह विमुक्त जाती (VJ-A), भटक्या जमाती (NT-B, NT-C, NT-D) नॉन-क्रिमीलेअर प्रवर्गातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विश्वासातून संस्था स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संशोधन, धोरणात्मक मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि शेती उद्योजकता प्रोत्साहन यांसारखे बहुआयामी उपक्रम राबवत आहे. ‘वनार्टी’ ही केवळ प्रशिक्षण देणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तनाची सशक्त चळवळ आहे. ज्ञानाच्या प्रकाशातून आत्मविश्वास जागवून, संधींची दारे खुली करून आणि समतेच्या मूल्यांना बळ देऊन समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हेच संस्थेचे ध्येय आहे. महानायक वसंतराव नाईक यांच्या विचारांचा वारसा जपत, आत्मनिर्भर, सुजाण आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पाने ‘वनार्टी’ आज विमुक्त जाती–भटक्या जमाती (VJNT) समाजासाठी आशेचा दीप आणि विश्वासाचा भक्कम आधार ठरत आहे.
 
  • संस्थेची स्थापना व वैशिष्ट्ये
 
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (VANARTI) ही संस्था विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवित आहे. संस्थेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. यात गोर बंजारा जमातीसह विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, क, ड यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी संशोधन, प्रशिक्षण व विविध प्रकल्प राबविणे. धोरणात्मक संशोधन, सर्वेक्षण व अभ्यास करून शासनाला मार्गदर्शन करणे. सामाजिक सक्षमीकरणासाठी जनजागृती, समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे. युवकांना सक्षम बनविण्यासाठी उद्योजकता, स्वयंरोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रम राबविणे. तसेच कृषी व उद्योजकता क्षेत्रातील संशोधन, मार्गदर्शन केंद्रे तसेच पुरस्कार व विद्यावेतन योजना राबविणे यांचा समावेश आहे. 
 
  • स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण
 
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. समाजातील विद्यार्थ्यांना उच्च प्रशासकीय सेवांमध्ये संधी मिळावी, या उद्देशाने पुढील परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. यात यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण, बँक भरती परीक्षा, रेल्वे भरती परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षा, मिलिटरी व पोलीस भरती प्रशिक्षण, TAIT परीक्षा प्रशिक्षण समावेश आहे. याशिवाय यूपीएससी व एमपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखत, तांत्रिक सेवा, न्यायिक सेवा आणि CAPF परीक्षांसाठीही आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येते.
 
 
  • कौशल्य व उद्योजकता विकास
 
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (VANARTI), नागपूर ही संस्था युवक-युवतींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम राबवत आहे. केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने उद्योजकता विकास प्रशिक्षण दिले जाते. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेऊन विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. वस्त्र उद्योग क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन Apparel, Made-ups & Home Furnishing संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या संधींचा विचार करून Telecom Sector Skill Council अंतर्गत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. पारंपरिक कौशल्यांना आधुनिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी Handicraft & Carpet Sector अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. जीवनशास्त्र (Life Science Sector) क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीही विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबविले जातात. याशिवाय विविध उद्योग आणि सेवा क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख व प्रात्यक्षिकाधारित कौशल्य विकास कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. या सर्व उपक्रमांद्वारे युवकांना रोजगारक्षम, स्पर्धाक्षम आणि आत्मनिर्भर बनविणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.
 
 
  •  इतर उपक्रम
 
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था समाजाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार आहे. यात युवा, महिला व कलाकार सक्षमीकरण कार्यक्रम, VANARTI Radio व Talk Show, स्पर्धा परीक्षा मेळावे, वसंतराव नाईक व अहिल्यादेवी होळकर साहित्य निर्मिती उपक्रमांसह शासकीय योजनांच्या प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रम राबविणे आहे.